नवी दिल्ली: अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारी मुंबईत काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहंकार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे मत त्यांनी मांडले. मुंबईत शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेला महामोर्चा हे लोकांच्या जबरदस्त उदाहरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध शेतकरी आणि आदिवासींनी काढलेल्या या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. नाशिकहून मुंबईपर्यंत 200 किलोमीटरची पायपीट करून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. या लाँग मार्चमध्ये तब्बल 40 हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे. 6 मार्चला नाशिकहून निघालेला हा मोर्चा 166 किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले. त्यामुळे सरकार खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. सध्या सरकार आणि मोर्चेकरी शेतकऱ्यांमध्ये बोलणी सुरू आहेत.
Kisan Long March: फडणवीसांनी अहंकार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात- राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:15 PM