नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांत एकसाथ कोरोना संकटाचा सामना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. ही चर्चा व्यवस्थितपणे पार पडली. यावेळी, कोरोना व्हायरसविरोधातील या लढ्यात भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचा पूर्ण ताकदीनिशी वापर करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे.
इस्त्रायलच्या पंतप्रधानांशीही साधला संवाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोनाचा सामना आणखी प्रभावी करण्यासंदर्भात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सोबतही फोनवरून संपर्क साधला होता. यावेळी मोदी आणि नेतन्याहू यांनी कोरोनाविरोधात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रिचा योग्य प्रकारे वापर करायचे ठरवले. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांत रुग्णांसाठी आवश्यक औषध पुरवठा चालू ठेवण्यावर आणि उच्च तंत्रज्ञा असलेल्या साधनांच्या वापरासंदर्भातही चर्चा झाली.
मोदी 8 मार्चला विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही साधणार संवाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि पंतप्रधानांच्या भाषणांवर टीका करत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. ते 8 एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माधमातून, ज्या पक्षांच्या खासदारांची संख्या कमीत कमी पाच आहे, अशा सर्व पक्षांशी संवाद साधतील.