पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (२१ एप्रिल २०२५) अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स आणि त्यांच्या कुटुंबाचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी महिन्यातील आपल्या वॉशिंग्टन डीसीला दिलेल्या यशस्वी भेटीसंदर्भात आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. जेडी वेन्स हे आपल्या कुटुंबासह ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि उपाध्यक्ष वेन्स यांनी, याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या भेटीनंतर, द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगती, ऊर्जा, संरक्षण आणि धोरणात्मक तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. यावेळी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आपण या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीची प्रतीक्षा करत आहोत, असेही म्हणाले.
या बैठकीनंतर, प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चा झाली. खरे तर, भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चेच्या पुढील टप्प्यात असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांमधील ही बैठक झाली आहे. तथापि, आपण कोणत्याही करारासाठी घाई करणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर, जेव्हा भारताच्या चिंता लक्षात घेतल्या जातील, तेव्हाच करार होईल, असे भारताने म्हटले आहे. वॉशिंग्टन डीसी येथे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही पक्षांनी २०२५ च्या अखेरपर्यंत द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर चर्चा केली जाईल, अशी घोषणा केली होती.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर गत १० टक्के शुल्काऐवजी २६ टक्के शुल्क लादले होते. मात्र, सध्या नवीन परस्पर शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित केले आहे.