नवी दिल्ली-
नवी दिल्लीतील इंडिया गेट (India Gate) येथे नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं इंडिया गेटवर असलेली अमर जवान ज्योत आता राष्ट्र्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात असतानाच आज मोदींनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याची घोषणा केली आहे.
"संपूर्ण देश सध्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की नेताजींची संपूर्ण ग्रेनाईटनं तयार करण्यात येणारी भव्य प्रतिमा इंडिया गेट येथे उभारली जाईल. त्यांनी केलेल्या कार्याप्रती हा एक सन्मान ठरेल", असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सोबतच इंडिया गेटवर ज्या चबुतऱ्यावर नेताजींचा प्रस्तावित पुतळा उभारला जाणार आहे त्याचा एक फोटो देखील ट्विट केला आहे.
इंडिया गेट आणि राष्ट्रीय स्मारकच्यामध्ये एक रिकामी चबुतरा आहे. याच ठिकाणी नेताजींचा पुतळा उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा चबुतरा रिकामी आहे. याआधी या चबुतऱ्यावर जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. १९६८ साली तो चबुतऱ्यावरुन हटवण्यात आला आणि तो कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आला होता. तेव्हापासून हा चबुतरा रिकामीच आहे.