लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना व्यवस्थापन आणि लसीकरणावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष दुष्प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी याला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना साथ हा राजकीय मुद्दा नाही. तर, मानवतेशी संबंधित मुद्दा आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्क राहून उपाययोजनांची तयारी आतापासूनच करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, दिल्लीत अद्याप फ्रंटलाइन वर्करचे २० टक्केही लसीकरण झाले नाही. दोन वर्षांपासून देश साथीला तोंड देत आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पण, विरोधक बेजबाबदारपणे वागत आहेत. विरोधकांनी सभागृहात केलेला गदारोळ आणि कामकाजात अडथळे आणणे, याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली. बैठकीत मोदी म्हणाले की, साथीच्या काळात एकही व्यक्ती उपाशी झोपू नये, याची काळजी घेतली. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसला वाटते की, सत्तेत राहण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे.