पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (8 जुलै) तेलंगणातील वारंगलमध्ये 6,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी तेलंगणा राज्यातील केसीआर सरकारवर नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. "तेलंगणा सरकारने काय केले? तर येथील राज्य सरकारने केवळ 4 कामे केली आहेत. पहिले म्हणजे मोदी आणि केंद्र सरकारला शिव्या घालण्याचे काम सकाळ-संध्याकाळ केले आहे. दुसरे म्हणजे केवळ एकाच कुटुंबाला सत्तेचे केंद्र बनवून स्वतःला तेलंगणाचे धनी सिद्ध करण्याचे काम त्यांनी केले आहे. तिसरे म्हणजे, त्यांनी तेलंगणाच्या विकासाला खिंडार पाडले आणि चौथे काम म्हणजे त्यांनी तेलंगणाला भ्रष्टाचारात बुडवले. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार", अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला.
याचबरोबर, नरेंद्र मोदींनी देशातील विकासाबद्दल भाष्य केले. तेलंगणातील लोकांच्या ताकदीने भारताची ताकद नेहमीच वाढवली आहे. आज भारतातील अर्थव्यवस्था जगातील 5 व्या नंबरवर आहे, त्यात तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी येत आहे, तेव्हा तेलंगणासमोर अनेक संधी उपलब्ध असतील. आजचा भारत हा नवा भारत आहे. एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात एक सुवर्णकाळ आपल्याकडे आला आहे. या संधीच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. वेगवान विकासाच्या शक्यतेमध्ये देशाचा कोणताही कोपरा मागे राहू नये, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नवीन ध्येयांसाठीही नवीन मार्ग काढावे लागतात. जुन्या पायाभूत सुविधांवर भारताचा वेगवान विकास शक्य नव्हता. म्हणूनच आमचे सरकार पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आज, प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम केले जात आहे. आज देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग, इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे जाळे निर्माण होत आहे. तरुणांसाठी रोजगाराचे आणखी एक मोठे माध्यम देशातील उत्पादन क्षेत्र बनत आहे. 'मेक इन इंडिया' मोहीम राबविली जात आहे. देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही PLI योजना सुरू केली आहे. याचा अर्थ जो जास्त उत्पादन करतो त्याला भारत सरकारकडून विशेष मदत मिळत आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.