बेंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभेसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली प्रचारसभा दक्षिण कर्नाटकामध्ये होणार आहे. कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी येण्याआधीपासूनच कर्नाटकचे सिद्धरामय्या यांनी त्यांच्यावर ट्वीटरवरून आघाडी उघडली आहे. चामराजनगर येथे पंतप्रधान मोदींची पहिली सभा होणार असून माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पाही उपस्थित राहाणार आहेत. त्यानंतर उडुपी येथे जाऊन तेथील धार्मिकस्थळांनाही ते भेट देण्याची शक्यता आहे.
खाणसम्राट जनार्दन रेड्डी आणि भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करुन देणारे ट्वीट करण्यास सिद्धरामय्या यांनी सुरुवात केली आहे. जनार्दन रेड्डी यांच्यापासून भाजपाचे अध्यक्ष अमित शाह अंतर राखून प्रचार करत असले तरीही जनार्दन रेड्डी भाजपाच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत, त्यामुळे विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली.
एका ट्वीटमध्ये सिद्धरामय्या लिहितात, प्रिय नरेंद्र मोदी, तुम्ही कर्नाटकात येत आहात हे समजलं. आमच्या राज्यात आम्ही तुमचं स्वागत करतो. तुम्ही येथे याल तेव्हा आमच्या काही प्रश्नांबद्दल तुम्ही बोलाल असे कन्नडिगांना वाटते असं पहिलं ट्वीट त्यांनी करुन पुढे काही प्रश्न त्यांनी विचारले आहेत. येडीयुरप्पा अजुनही तुमचे मुख्यमंत्रीपदाचे आहेत का कर्नाटकाला जाणून घ्यायचं आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तुमच्या पक्षाने रेड्डी बंधूंच्या नातेवाईक आणि मित्रांना 9 तिकिटे दिली आहेत, त्यानंतर तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारावर भाषणही द्याल, कृपया हे ढोंग थांबवा असेही ट्वीट त्यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धरामय्या यांच्या सरकारवर टेन पर्सेंट गव्हर्नमेंट अशी टीका केली होती. सिद्धरामय्या सरकार प्रत्येक विकासकामात 10 टक्के पैसे खाते असा त्यांचा आरोप होता. नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री 60 प्रचारसभांमधून प्रचार करणार आहेत.