पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सुरुवात प्रसन्नतेने आणि मोठ्या उत्साहात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सभापतींच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केला आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात हवन आणि पूजेने झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूजा केली. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. नवी संसद भवन त्रिकोणी आकारात बांधण्यात आली आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले. नव्या संसद भवनाच्या रविवारी होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिनामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी सेंगोल (राजदंड) सुपूर्द केला होता. दिल्लीत उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
२१ राजकीय पक्षांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असल्यामुळे ५५० पेक्षा अधिक खासदार उपस्थित राहणार नाहीत, असा अंदाज आहे. रालोआच्या सदस्य पक्षांसह २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी होतील. बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या सर्व १० खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, कुंवर दानिश अली यांच्यासह ४ बसपा खासदारांनी कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.