Pm Modi - US, Khalistan Pannu Murder ( Marathi News ): खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा कॅनडाकडून करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेनेही कॅनडाच्या सुरात सूर मिसळला होता. त्यात आता अमेरिकेच्या दाव्यावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडे याबाबत काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी खडसावले आहे. यासोबतच पंतप्रधान म्हणाले की, अशा काही घटनांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.
फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, "जर कोणी मला याबाबत काही पुरावे दिले तर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू. आपल्या नागरिकांपैकी कोणी काही चांगले-वाईट केले असेल तर त्याचा विचार करू. कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आमची कायमच बांधिलकी आहे. पण पाश्चात्य देशांनी फुटीरतावादी घटकांना प्रोत्साहन देऊ नये. भारताने 2020 मध्ये गुरपतवंत सिंह पन्नू यांना दहशतवादी घोषित केले होते."
समिती तपासणार अमेरिकेच्या दाव्यातील तथ्य
अमेरिकेने अलीकडेच पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा केला होता. या कटात एका भारतीय अधिकाऱ्याचा हात असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले होते. अमेरिकेच्या या आरोपांनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक समिती स्थापन केली. ही समिती अमेरिकेचे दावे आणि पुरावे तपासणार आहे.
अमेरिकेचा नेमका दावा काय?
अमेरिकेच्या विधी विभागाने २९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारतीय वंशाच्या निखिल गुप्ता याने न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी नेता पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. गुप्ता यांना भारतीय अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्या होत्या. निखिल गुप्ताला जूनमध्ये झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच्या अमेरिकेला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.
पन्नू 2019 पासून NIA च्या रडारवर
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या वर्षी पन्नूविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. खलिस्तानी दहशतवादी पन्नू 2019 पासून एनआयएच्या रडारवर आहे. परदेशात राहून पन्नू सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे अशी माहिती तपास यंत्रणांकडे होती. पंजाबमध्ये फुटीरतावाद वाढल्याचा आरोप त्याच्यावर होता. याशिवाय भारतात वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर होता.