नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर भाष्य करणारे अभिजीत बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना सावधपणे उत्तरं देताना दिसले. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला लक्षवेधी उत्तर दिलं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी टाकलेल्या जाळ्यात अडकू नका, असं मोदींनी भेटीदरम्यान सांगितल्याचं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मोदींची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मोदींसोबतची भेट उत्तम होती. मोदींनी संवादाची सुरुवात एका विनोदानं केली. मला (अभिजीत यांना) मोदीविरोधी विधानं करण्यासाठी माध्यमांकडून कसं भरीस पाडलं जाईल, हे पंतप्रधानांनी भेटीच्या सुरुवातीलाच सांगितलं,' असं बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाले. 'पंतप्रधान टीव्ही पाहतात. त्यांची सगळ्या गोष्टींवर नजर आहे. ते प्रसारमाध्यमांवरही लक्ष ठेवून आहेत. तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) काय करण्याचा प्रयत्न आहात, यावर मोदींची नजर आहे,' असं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
माध्यमांच्या 'त्या' प्रश्नांपासून सावध राहा; मोदींचा नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 5:09 PM