केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणालाही घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं आहे. भ्रष्टाचाराच पाळंमूळं आपल्याला संपवावी लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. एका रेकॉर्डेट व्हिडीओद्वारे त्यांनी CBI आणि CVC च्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं.
"आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येणारी २५ वर्षे म्हणजेच अमृत काळात आपला देश आत्मनिर्भर भारतच्या संकल्पासह पुढे जात आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स, प्रो पिपल, प्रो अॅक्टिव्ह गव्हर्नन्स यांना सशक्त करण्याचं काम करत आहोत," असं मोदी म्हणाले. "भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा तो कोणा ना कोणाचा हक्क हिसावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. तो राष्ट्राच्या प्रगतीत बाघधाही आणतो आणि सामूहिक शक्तीच्या रूपात प्रभावितही करतात," असंही ते यावेळी म्हणाले.
"देशाची फसवणूक करणारे, गरीबांना लुटणारे, कितीही ताकदवान असले तरी देश आणि जगात कुठेही असले तरी आता त्यांच्यासाठी दया दाखवली जाणार नाही, सरकार त्यांना सोडत नाही असा विश्वास आज देशातील प्रत्येकाला आला आहे," असंही मोदींनी नमूद केलं. गेल्या सहा सात वर्षांपासून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे भ्रष्टाचार रोखणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. कोणत्याही देवाण-घेवाणीशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणं शक्य आहे यावरही विश्वास निर्माण झाल्याचं ते म्हणाले.