नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी दिल्लीच्या विकासाबाबत मोदींशी चर्चा केल्यानंतर त्यांना दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.
केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारने शिक्षण क्षेत्रात शानदार काम केले असून सरकारी शाळेचा निकाल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचले. तसेच दिल्लीतील शाळा पाहिल्यानंतर मोदींचं मनोबल उंचावेल, असही केजरीवाल यांनी म्हटले. यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक आणि पॉलीक्लिनीकला भेट देण्याचे आमंत्रण देखील मोदींना दिले.
या भेटीत केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासासंदर्भात मोदींशी चर्चा केली. राजधानी दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावे लागेल. दिल्ली केंद्रासोबत मिळून काम करणार असून केंद्र देखील दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली. मोदींसोबत झालेल्या चर्चेत केजरीवाल यांनी युमना नदीच्या पाण्यासंदर्भात देखील चर्चा केली. दिल्लीला पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे यमुना नदीवर पाणी स्टोरेज करण्यासाठी आमच्याकडे योजना असल्याचे म्हटले आहे.