पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याबरोबरच, व्यापक आणि संतुलित FTA चे महत्व, या विषयावरही चर्चा झाली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, 'आज ऋषी सुनक यांच्यासोबत चर्चा करून आंद वाटला. ब्रिटेनच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही आपली व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी सोबतीने काम करू. आम्ही एका व्यापक आणि संतुलित FTA च्या महत्वावरही सहमती दर्शवली आहे.'
पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर सुनक यांचे उत्तर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर, ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे उत्तरही आले आहे. सुनक यांनी ट्विट केले आहे, की 'मी कार्यभार सांभाळल्याबद्दल आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. ब्रिटन आणि भारत बरेच काही शेअर करतात. आपल्या दोन्ही देशांतील सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक भागीदारी येणाऱ्या काळात कशा पद्धतीने पुढे नेता येऊ शकते, यासाठी मी उत्सुक आहे.'
दिवाळीच्याच दिवशी सुनक यांची बिनविरोध निवड - ऋषी सुनक यांनी मंगळवारी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून कारभार स्वीकारला. त्यांची दिवाळीच्याच दिवशीच कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध निवड झाली होती. ब्रिटेनचे पंतप्रधान अथवा माजी अर्थ मंत्री सुनक (42) हे हिंदू आहेत. तसेच ते 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत.