हैदराबाद - तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी प्रचाराला सिकंदराबादला पोहोचले. मोदींनी इथं अनुसूचित जातीच्या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक असलेल्या मडिगा समाजाच्या रॅलीला संबोधित केले. या रॅलीला संबोधित करण्यापूर्वी व्यासपीठावर असे काही घडले, की तो चर्चेचा विषय बनला. मंचावरच एमआरपीएस प्रमुख मंदा कृष्णा मडिगा भावूक झाले आणि त्यांना रडू कोसळले. त्यानंतर पीएम मोदींनी त्यांचं सांत्वन केले.
पीएम मोदींनी एमआरपीएस प्रमुखांना मिठी मारली
मंदा कृष्णा मडिगा हे शनिवारी हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान मोदींसोबत एकत्र आले होते. यादरम्यान दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. पंतप्रधानांशी बोलत असताना मडिगा अचानक भावूक झाले आणि रडले. यानंतर पंतप्रधानांनी मडिगा यांचा हात धरून त्यांचे सांत्वन केले. पीएम मोदींनी त्यांना मिठी मारली. माडिगा आरक्षण पोराटा समितीने या रॅलीचे आयोजन केले होते.
पीएम मोदींनी रॅलीला केलं संबोधित
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर तुम्ही देशात अनेक सरकारे पाहिली आहेत, आमचे सरकार असे आहे की ज्यांचे सर्वोच्च प्राधान्य गरिबांचे कल्याण, वंचितांना प्राधान्य देणे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा भाजपचा मंत्र आहे.
काँग्रेस-BRS वर निशाणा
मी माडिगा समाजातील लोकांना सांगेन की, तुम्हाला BRS पासून जितकं सतर्क राहायचे आहे तितकेच काँग्रेसपासून सावध राहा. बीआरएस दलितविरोधी आहे आणि काँग्रेसही यात कमी नाही. नवीन राज्यघटनेची मागणी करून बीआरएसने बाबासाहेबांचा अपमान केला आणि काँग्रेसचा इतिहासही असाच आहे. काँग्रेसमुळेच बाबासाहेबांना अनेक दशके भारतरत्न देण्यात आले नाही असा आरोप मोदींनी केला.
ही रॅली राजकीयदृष्ट्या महत्त्वाची
ही रॅली राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. MRPS चा मडिगा समुदायातील लोकांचा लक्षणीय प्रभाव आहे. त्याचबरोबर तेलंगणातील अनुसूचित जातींमध्ये मडिगा समाजाचा वाटा सर्वाधिक आहे. अंदाजे ६० टक्के समाज आहे. एवढेच नाही तर राज्यातील २० ते २५ विधानसभा जागांवरील निकालात मडिगा समाजाची भूमिका महत्त्वाची ठरते असा दावाही राजकीय जाणकारांनी केला आहे.