पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात आला. “कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. ओमिक्रॉन आणि त्याचे अन्य व्हेरिअंट्स गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. युरोपमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.
“भारताच्या ९६ टक्के वयस्कांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि १५ वर्षांवरील ८५ टक्के मुलांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. मार्चमध्ये आम्ही १२ ते १४ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू केलं. त्यानंतर आता ६ ते १२ वर्षांमच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे,” असंही त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर सर्व मुलांचं लसीकरण करण्याला आमचं प्राधान्य आहे. यासाठी आपल्याला शाळांमध्ये मोहीम सुरू करण्याची गरज आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी याबाबत जागरुक राहायला हवं असल्याचंही मोदींनी सांगितलं.