- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनीच घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे घाबरले असून, आता काय करावे हे त्यांना समजत नाही. हे सरकार कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर खेळत असून, ज्या दिवशी इतर देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढतील त्या दिवशी देश या मोदी सरकारच्या धोरणांनी गंभीर संकटात सापडेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.
ते म्हणाले, गेल्या ७ वर्षांत या सरकारने लोकांचे खिसे कापून २३ लाख कोटी रुपये कमावले. मोदी देशाची संपत्ती आपल्या मोजक्या मित्रांच्या हवाली करीत आहेत. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी मोदी यांनी शेतकरी, व्यापारी, लहान, मध्यम व्यापारी, दुकानदारांशी थेट संवाद साधावा म्हणजे नेमका दृष्टिकोन मिळेल. राहुल गांधी यांनी म्हटले की, कमावलेले २३ लाख कोटी रुपये कोठे गेले, याचा खुलासा सरकारला करावा लागेल. राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलताना म्हटले की, मोदी सरकारने देशाला आर्थिक दृष्टीने १९९० च्या अवस्थेत आणून उभे केले आहे.
मंत्रीच संभ्रमित
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या मंत्र्यांबद्दल म्हटले की, मोदी यांच्या निर्णयांमुळे ते सगळेच संभ्रमित आहेत. याच कारणामुळे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे बोलत आहेत, कारण त्यांना वस्तुस्थिती काय आहे, हेच माहीत नाही.