PM Modi on Myanmar Thailand Earthquake:म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भुकंपामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी सकाळी ११.५० च्या सुमारास म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा प्रभाव भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्येही जाणवला. म्यानमार आणि थायलंडमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्यानमारमधील या तीव्र भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता. या भूकंपामुळे इमारती आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूकंपामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर २०० लोक जखमी झाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकामाधीन असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साइटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या भीषण विध्वंसाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
“म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करुयात. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केली आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भूकंपाच्या विध्वसांमुळे थायलंडमध्ये उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बँकॉकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.मोठ्या इमारती कोसळल्यामुळे थायलंडमध्ये सध्या अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे भूकंपामुळे म्यानमारमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिल्लीत म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का!
दरम्यान, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात १५-२० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार होता. भारतात आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.