पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. तीन राज्यांत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. परंतू, मोदींनी विधानसभेच्या रिंगणात उतरविलेल्या त्यांच्या खासदार शिलेदारांचे काय झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपाने २१ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यापैकी जे जिंकले ते खासदारकीचा राजीनामा देणार का? की लोकसभेतच राहणार, पोटनिवडणूक होणार का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
मोदींच्या या शिलेदारांमध्ये मंत्रीदेखील होते. या २१ पैकी ९ खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिंकलेल्यांमध्ये नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप सिंह, रीति पाठक, दीया कुमारी, बाबा बालकनाथ, डॉ. किरोड़ी लाल मीणा, राज्यवर्धन सिंह राठोड़, रेणुका सिंह, गोमती साय, अरुण साव यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे.
तर केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, गणेश सिंह, भागीरथ चौधरी, नरेंद्र कुमार खीचड़, देवजी पटेल, विजय बघेल, बंदी संजय कुमार, अरविंद धर्मपुरी व सोयम बाबू यांना विधानसभा मतदारसंघांत पराभूत व्हावे लागले आहे. जे खासदार विधानसभेत हरले त्यांचे काय होणार हा देखील प्रश्न जनतेला पडू लागला आहे.
येत्या काही महिन्यांत लोकसभेची निवडणूक लागणार आहे. हरलेल्या खासदारांना भाजपा पुन्हा उमेदवारी देणार? जिंकलेल्या खासदारांना भाजपा राज्यात ठेवणार की केंद्रात आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, विधानसभा हरले याचा अर्थ ते लोकसभा लढवू शकणार नाहीत असा होत नाही. काही ठिकाणी विरोधात तुल्यबळ उमेदवार होते. भूपेश बघेल यांना विजय बघेल यांनी चांगली टक्कर दिली. तेलंगणात तिन्ही खासदार पडले असले तरी तेथील लोकांना बदल हवा होता. ही निवडणूक सत्ताविरोधी लाटेवर जिंकली गेली, असे या नेत्याने सांगितले.