नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज गुजरातमधील भरूच येथे आयोजित 'उत्कर्ष समारंभ'ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. यावेळी नरेंद्र मोदींनी लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि भावूक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.
एका लाभार्थीच्या मुलीशी संवाद साधताना नरेंद्र मोदी भावूक झाले. लाभार्थीने सांगितले की, मुलीला मोठी झाल्यानंतर डॉक्टर व्हायचे आहे. यानंतर नरेंद्र मोदींनी लाभार्थीची मुलगी आल्यासोबत संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी तिला विचारले की, डॉक्टर बनण्याची कल्पना कधी आली? यावर आल्याने सांगितले की, वडिलांची तब्येत पाहून मला डॉक्टर बनण्याचा विचार आला.... हे बोलताना आल्या थांबली आणि भावूक झाली. त्यानंतर तिला पाहून नरेंद्र मोदीही भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नरेंद्र मोदी लाभार्थीला म्हणाले, "तुमच्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला कळवा."
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आजचा कार्यक्रम म्हणजे आमचे सरकार प्रामाणिक आहे आणि एक संकल्प घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारे सरकार आहे याचा पुरावा आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित चार योजनांच्या शंभर टक्के योगदानाबद्दल मी भरूच जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो."
कार्यक्रमात 13 हजार लाभार्थ्यांची ओळख पटलीगुजरातमधील भरूच येथे हा कार्यक्रम सकाळी 10:30 च्या दरम्यान सुरु झाला. या कार्यक्रमात 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चार सरकारी योजना अधोरेखित करण्यात आल्या. दरम्यान, उत्कर्ष उपक्रमांतर्गत विधवा, वृद्ध आणि निराधारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या 4 सरकारी योजनांतर्गत सुमारे 13 हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.