“जेव्हा मी येथून जात होतो, तेव्हा मला माझ्या ज्येष्ठांना आणि मातांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचो. एकविसाव्या शतकातील विकासासाठी भगिनी आणि माता यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आज लष्करापासून ते उद्योगांपर्यंत महिलांसाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यांचे जीवन सोपे होते. त्यांना संधी देण्यास आमचे प्राधान्य आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बेडोदा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले होते. त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
“मला पावागडमध्ये देवीच्या भक्तांसाठी आधुनिक सुविधा देण्याची संधी मिळाली. देशवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी मी देवीकडे प्रार्थना केली आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळात सुवर्ण भारताचा संकल्प पूर्ण होवो यासाठी आशीर्वाद मागितले,” असे मोदी यावेळी म्हणाले. आज मातृवंदनेचा दिवस आहे आणि मी सकाळी माझ्या आईचेही आशीर्वाद घेतले असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत गुजरातमधील शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्याचे अभूतपूर्व काम झाले आहे. आतापर्यंत मंजूर १०.५० लाख घरांपैकी सुमारे ७.५० लाख घरे शहरी गरीब कुटुंबांना देण्यात आली आहेत. आमच्या डबल इंजिन सरकारने गेल्या ८ वर्षांत महिलांना सक्षम केले आहे. भारताच्या विकासासाठी त्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आज लष्करापासून खाणींपर्यंत महिलांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.