रायपूर - राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरण्यात येत आहे. यातच पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वादग्रस्त टीका करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना उपचाराची गरज आहे असं विधान भूपेश बघेल यांनी करत नरेंद्र मोदी यांचे विधान असंवेदनशील आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, राष्ट्राच्या निर्माणासाठी राजीव गांधी यांनी मोलाचा वाटा उचलला होता. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी राजीव गांधी यांनी बलिदान दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर देशाचा सर्वोच्च सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीने अशारितीने भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे हे शोभणार नाही. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं दिसून येतं. त्यांना उपचाराची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून फक्त 3-4 तास झोपतात. झोप पूर्ण होत नाही म्हणून त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. ज्याची मानसिक स्थिती खराब आहे त्या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च स्थानावर असणं हे देशासाठी धोकादायक आहे असंही भूपेश बघेल यांनी सांगितलं. तसेच मोदींचे देशाबद्दल प्रेम फक्त धोका आहे. त्यांना फक्त सत्ता आणि खुर्ची याची एवढं प्रिय आहे. सत्ता काबीज करण्यासाठी मोदी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या विधानावरुन ते निवडणुकीत पराभूत होणार आहेत हे सिद्ध होत आहे असा टोला भूपेश बघेल यांनी लगावला. त्याचसोबत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 150 पेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही. तर युपीए 300 पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल असा दावा भूपेश बघेल यांनी केला आहे.
राजीव गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले होते की, 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.