पंतप्रधान मोदींनी केले अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक; VIDEO पोस्ट करत म्हणाले, "घाणेरडे राजकारण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:33 PM2024-07-31T13:33:28+5:302024-07-31T13:35:28+5:30

Parliament Session 2024 : लोकसभेत मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी शेअर केला आहे.

PM Modi has shared video of the speech delivered by Minister Anurag Thakur in the Lok Sabha | पंतप्रधान मोदींनी केले अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक; VIDEO पोस्ट करत म्हणाले, "घाणेरडे राजकारण..."

पंतप्रधान मोदींनी केले अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक; VIDEO पोस्ट करत म्हणाले, "घाणेरडे राजकारण..."

Anurag Thakur : लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारची महाभारतात रचलेल्या ‘चक्रव्यूहा’ची तुलना करून हल्लाबोल केला. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात असल्याचे म्हणत राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दुसऱ्या दिवशी चर्चेदरम्यान, मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केलं आहे.

राहुल गांधी यांच्या भाषणानंतर मंगळवारी संसदेत खूप गोंधळ उडाला. लोकसभेत मंत्री अनुराग ठाकूर यांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी आपल्याला शिवी दिल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यावरुनच सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे  पंतप्रधान मोदींनीही अनुराग ठाकूर यांनी सभागृहात दिलेल्या भाषणाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी अनुराग ठाकूर यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

"हे भाषण माझे तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे आहे, जे ऐकायलाच हवे. त्यात तथ्यांचा समावेश आहे. यातून इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड होत आहे," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. यासोबत पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याही भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. "या वर्षीचा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकासाठी काय देतो याचे एक अतिशय व्यापक चित्र सादर करतो. विकास आणि सुधारणांसाठी आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचा अर्थमंत्री निर्मला सीतारमन पुनरुच्चार करत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लोकसभेत सोमवारी राहुल गांधी यांनी कमळाचा हिंसाचाराशी संबंध जोडला होता. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या वक्तव्यावर पलटवार करत, कमळाला  राजीवसुद्धा म्हणतात, त्यामुळे ते राजीव गांधींनाही वाईट मानतात का? असा सवाल केला. ज्यांची जात कोणाला माहिती नाही, ते आज जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करत आहे, असंही म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष केलं. 

दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यानंतर कन्नौजचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि ठाकूर यांच्यात जोरदार वादावादी झाली. अनुराग ठाकूर सभागृहात कोणाच्याही जातीबद्दल कसे बोलू शकतात असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.

Web Title: PM Modi has shared video of the speech delivered by Minister Anurag Thakur in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.