नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार-2 स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शहिदांच्या मुलांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नॅशनल डिफेन्स फंडाद्वारे येणाऱ्या 'पंतप्रधान स्कॉलररशीप योजने'त मोठे फेरबदल करण्यात आले असून दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुलांची स्कॉलरशीप दरमहा 2 हजार रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, मुलींची स्कॉलरशीप 2250 रुपयांवरून 3000 रुपये करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, 'आमच्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी समर्पित आहे.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आल्यानंतर मोदी सरकार-2 ची पहिली कॅबिनेट बैठक संध्याकाळी पार पडली. या बैठकीच्या आधी पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.