उना : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील उना दौऱ्यावर आहेत. याठिकाणी नरेंद्र मोदींचे लोकांनी जोरदार स्वागत केले आणि घोषणाबाजी केली. ज्यावेळी नरेंद्र मोदी येथील लोकांमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांचे 'देखो-देखो कौन आया, शेर आया शेर आया...', अशा घोषणांनी स्वागत करण्यात आले. यादरम्यानच्या एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उना जिल्ह्यातील अंब अंदौरा येथून नवी दिल्लीसाठी चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आले होते. नरेंद्र मोदीही ट्रेनमध्ये गेले आणि तेथून त्यांनी लोकांना हात दाखवून अभिवादन केले. ट्रेनमधून उतरल्यानंतर नरेंद्र मोदी लोकांमध्ये पोहोचले. यावेळी नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
वंदे भारत ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल आणि अंबाला, चंदीगड, आनंदपूर साहिब आणि उना येथे थांबेल. ही ट्रेन फक्त 52 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पकडते. या ट्रेनच्या प्रारंभामुळे हिमाचल प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रवाना झालेली वंदे भारत ट्रेन, ही पूर्वीपेक्षा सुधारित आवृत्ती आहे, जी कमी कालावधीत उच्च गती गाठण्यास सक्षम आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी उना जिल्ह्यात बल्क ड्रग पार्कची पायाभरणीही केली. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT)- उना ही राष्ट्राला समर्पित केले.
नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- उनाची पायाभरणी केली होती. तत्पूर्वी, उना येथील पेखुबेला हेलिपॅडवर पोहोचल्यावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधानांचा हिमाचल प्रदेशचा हा नववा दौरा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.