भुवनेश्वर: काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते ओदिशातील बारिपदामध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. भाजपा सरकारच्या काळात नामदारांची अनेक रहस्यं उलगडत आहेत. त्यामुळेच त्यांना आमचं सरकार खटकत आहे, असं मोदी म्हणाले. 'हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्त मिशेलला परदेशात भारतात आणण्यात आलं आहे. त्याच्या चिठ्ठीतून अनेक काँग्रेस नेत्यांची नावं समोर येत आहेत. मिशेल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, मंत्र्यांना ओळखतो. पंतप्रधान कार्यालयात कोणत्या फाईल्स जात होत्या, कोणते निर्णय घेतले जात होते, याची जितकी माहिती या मध्यस्ताला होती, तितकी कदाचित त्यावेळच्या पंतप्रधानांकडेही नसेल,' अशा शब्दांमध्ये मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला.