PM Modi meets Kannada actors : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी संध्याकाळी बंगळुरू येथील राजभवनात कन्नड अभिनेता यश (Yash) आणि ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांची भेट घेतली. येलहंका एअर स्टेशनवर एरो इंडिया शोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरुमध्ये आले होते. यावेळी दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांची पत्नी अश्विनी राजकुमारही पंतप्रधान मोदींसोबत दिसल्या. या भेटीत सिनेमा, कर्नाटकची संस्कृती अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी कलाकारांना सांगितले की, दक्षिणेकडील राज्यांच्या चित्रपटाने भारताची संस्कृती आणि ओळख मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यांनी विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतील उद्योगांनी महिलांच्या सहभागाला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले आहे याचे कौतुक केले. सांस्कृतिक ओळख वाढवण्यासाठी आणि चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांना प्राधान्य देण्याच्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रयत्नांचेही मोदींनी कौतुक केले.
दरम्यान, अभिनेता यशच्या 'केजीएफ' चित्रपटाने देशभर प्रसिद्धी मिळवली. यशची पडद्यावरची धमाकेदार एन्ट्री आणि अभिनयामुळे तो आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय. यशला 'द रॉकिंग स्टार' असेही म्हटले जाते. यशनेही पीएम मोदींची भेट घेतली. तसेच, अभिनेता ऋषभ शेट्टीही गेल्या वर्षी देशभरात प्रसिद्ध झाला. 'कंतारा' चित्रपटातील दमदार अभिनयाने देशभरात वाहवा मिळवली. ऋषभ शेट्टीनेही पीएम मोदींची भेट घेतली.
याशिवाय दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांची पत्नी अश्विनी राजकुमार यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचीही आठवण काढली. यासोबतच अनेक खेळाडूंनीही पीएम मोदींची भेट घेतली. यामध्ये जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळेसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.