PM Modi in Bulandshahr: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून त्यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्यांनी 19 हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधानांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जयने केली. भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. आता राष्ट्र उभारणीचा मार्ग रामाच्या नावाने आणखी मोठा होणार. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तसेच, तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प असल्याचेही म्हटले. याशिवाय, अप्रत्यक्षपणे त्यांनी 2024 मध्ये आपल्या बंपर विजयाची घोषणाही केली.
कल्याण सिंह यांची आठवणपंतप्रधान पुढे म्हणाले की, जीवनात तुमचे प्रेम आणि विश्वास मिळणे यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते. तुमच्या प्रेमाने मी भारावून गेलोय. आज एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनींना पाहतोय. आपल्या घरातील कामे सोडून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे विशेष आभार मानतो. या प्रदेशाने देशाला कल्याणजींसारखा सुपुत्र दिला, ज्यांनी आपले जीवन राम आणि राष्ट्रकार्य या दोन्हींसाठी समर्पित केले. आज ते जिथे कुठे असतील, अयोध्याधाम पाहून त्यांना खूप आनंद झाला असेल.
विकसित भारत आमचे ध्येय पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येत मी रामललाच्या उपस्थितीत सांगितले होते की, प्राणप्रतिष्ठा करण्याचे काम पूर्ण झाले, आता देशाच्या प्रतिष्ठेला नवीन उंची देण्याची वेळ आली आहे. देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे जाण्याचा मार्ग आपल्याला पुढे करायचा आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.