तामिळनाडूत भाजप आणि सत्तेत असलेले द्रमुक हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. पण आज जेव्हा पंतप्रधान मोदी चेन्नईला पोहोचले तेव्हा तेथील दृष्य वेगळंच पाहायला मिळालं.
पंतप्रधान जेव्हा गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देत होते, तेव्हा मोदींनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनाही पुढे बोलावलं आणि लाभार्थ्यांना चाव्या देण्यास हातभार लावण्यास सांगितलं. यावेळी जिथं भाजप समर्थक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते, तिथंच द्रमुक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने घोषणाबाजी करत होते.
"देशाच्या जीडीपीमध्ये तामिळनाडूचा मोठा वाटा आहे, परंतु मोबदल्यात केवळ १.२ टक्के निधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारनंही राज्यातील मच्छिमारांची काळजी घ्यावी", असे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले. यासोबतच स्टॅलिन यांनी हिंदीचा मुद्दा उचलून धरला. तमिळ भाषेलाही हिंदीच्या बरोबरीचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
'वणक्कम' म्हणत पंतप्रधान मोदींनी केले स्वागतपीएम मोदींनी सीएम स्टॅलिन यांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सीएम स्टॅलिन आणि तिथल्या राज्य सरकारच्या मंत्र्यांना तमिळ भाषेत 'वणक्कम' म्हणत अभिवादन केलं. "तामिळनाडूची भाषा, संस्कृती आणि लोक उत्कृष्ट आहेत. इथं येणं नेहमीच खास ठरतं", असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी प्रसिद्ध तमिळ कवी भरथियार यांच्या ओळीही वाचल्या.
तमिळ ही शाश्वत आणि वैश्विक भाषा: पंतप्रधान मोदी१६ ऑलिम्पिक पदकांपैकी ६ पदकं तामिळनाडूच्या खेळाडूंनी जिंकली असल्याचा उल्लेख करत मोदींनी कौतुक केलं. यानंतर पीएम मोदींनी हिंदी-तमिळ भाषेच्या मुद्द्यावर सीएम स्टॅलिन यांना उत्तर देताना तामिळ ही शाश्वत आणि जागतिक भाषा असल्याचं म्हटलं. "भारत सरकार तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ तमिळ भाषा आणि संस्कृती या संस्थेला भारत सरकारकडून निधी दिला जात आहे", असंही मोदी म्हणाले.