PM Modi in Rajasthan: पंतप्रधान नरेंद्र मोदीराजस्थानच्या सीकरमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात श्याम बाबांच्या जयजयकाराने केली. पण त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीच्या 'इंडिया'वर हल्लाबोल केला. "विरोधकांना जर भारताची चिंता असती तर त्यांनी परदेशात जाऊन भारताबद्दल वाईट विधाने केली असती का? त्यांना भारताची काळजी असती तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते का? जर त्यांना भारताची काळजी असते तर त्यांनी गलवानमधील जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्न विचारले असते का? काँग्रेस आणि त्यांचे मित्रमंडळी अशा फसव्या आश्वासनांच्या धर्तीवर काम करत आहेत, ज्यात एका घोटाळ्याचे नाव बदलून दुसऱ्या नावाने नवीन घोटाळा सुरू केला जाऊ शकतो. 'इंडिया' आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशीच केली जाऊ शकते," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मोदी पुढे म्हणाले, "राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून विकासकामात अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मी राजस्थानच्या जनतेला वचन दिले होते की मी प्रत्येक घराला एक नळ कनेक्शन देईन, पण राजस्थान सरकारला ते अडवून ठेवायचे आहे. राजस्थानमध्ये तरुणांच्या भविष्याशी खेळले जात आहे. पेपर लीकचा उद्योग केला जात आहे. राजस्थानचे तरुण सक्षम आहेत, मात्र येथील सरकार त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. येथे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच पेपर लीक माफियांवर कृपा केल्याचा आरोप जात आहे. पेपर लीक माफियांपासून तरुणांना वाचवण्यासाठी काँग्रेसला हटवावेच लागेल."
"केंद्र सरकार राजस्थानच्या विकासासाठी सतत पैसे पाठवत आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना १० वर्षांत राजस्थानला फक्त १ लाख कोटी रुपये कर वाटा म्हणून देण्यात आले. गेल्या 9 वर्षात भाजपा सरकारने राजस्थानला कर वाटा म्हणून 4 लाख कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. 10 वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना राजस्थानला केवळ 50,000 कोटी केंद्रीय अनुदान म्हणून दिले होते, आमच्या सरकारने 9 वर्षात केंद्रीय अनुदानाच्या रूपात राजस्थानला 1.5 लाख कोटींहून अधिक निधी दिला आहे," अशी आकडेवारीही मोदींनी सांगितली.
"ही ऋषीभूमी आहे. या भूमीने भैरोसिंह शेखावत यांच्यासारखे नेते, उपराष्ट्रपती देशाला दिले आहेत. इथे आल्यावर दैवी अनुभूती मिळते आणि तुमचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे मला विश्वास आहे की राजस्थानमध्ये कमळ फुलणार आहे, राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन होणार आहे. येथे उपस्थित असलेला प्रचंड समुदाय हेच सांगत आहे," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.