नवी दिल्ली - गोव्यामध्ये पुढील आठवड्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केवळ ४० आमदारसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्यात विजय मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अनेक छोटे मोठे पक्ष आणि आघाड्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना गोव्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.
मोदी गोव्याचा उल्लेख करत काँग्रेसला घेतले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती आखली गेली असती तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे गोवा गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकून पडला नसता. गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या प्रतिमेची चिंता होती. त्यामुळे जेव्हा गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत होता, तेव्हाही नेहरू गोव्यात लष्कर पाठवणार नाही, असे सांगत होते. गोव्यावर काँग्रेसने हा अन्याय केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असा सवाल करतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात जे काही झालं तर काँग्रेसने केलं, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असं इथे वारंवार बोललं गेलं. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहीली असता. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.