'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:00 IST2025-03-07T17:58:05+5:302025-03-07T18:00:12+5:30
पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हिमपर्यंटन करण्याबरोबरच देशवासीयांना उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले.

'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार
उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी हिम पर्यटनाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी तीर्थस्थळांनाही भेट दिली. या हर्षिल येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशवासीयांना उत्तराखंडमध्ये पर्यटनाला आले पाहिजे असे आवाहन केले. भाविक, पर्यटकांपासून ते कॉर्पोरेट जगातील व्यक्ती आणि चित्रपट उद्योगाने हिवाळ्यात उत्तराखंडमध्ये आले पाहिजे, असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी हर्षिलमध्ये एका सभेला संबोधित केले. माणा येथे हिमडा कोसळून मृत्यू झालेल्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, "उत्तराखंडची भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलेली आहे. माँ गंगेच्या उगमस्थानी येऊन मी धन्य झालो आहे. गंगेच्या कृपेमुळेच मला अनेक दशके उत्तराखंडची सेवा करायला मिळाली. गंगेनेच मला काशीला बोलावलं आणि सेवा करायला मिळाली."
मोदी म्हणाले, 'गंगेने कुशीत घेतल्याचा भास झाला'
याच कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी मला माँ गंगेने कुशीत घेतल्याचा भास झाला. आपल्या मुलाप्रतीचं हे आई गंगेचंच तर प्रेम आहे, जे मला मुखवा गावात घेऊन आलं आहे. हर्षिलच्या भूमीत येऊन मला माझी दीदी भुलियाचीही आठवण झाली आहे. कारण ती इथून मला स्थानिक वस्तू पाठवत असते."
"बाबा केदारनाथच्या आशीर्वादामुळेच आज उत्तराखंडची प्रगती आणि विकास होत आहे. बोललेल्या गोष्टी सत्यात उतर आहेत. विकासाचे नवे रस्ते खुले होत आहेत. उत्तराखंड आता नव्या लक्ष्याच्या दिशने वाटचाल करत आहे", असेही मोदी यावेळी म्हणाले.
प्री वेडिंग, चित्रपटाच्या शुटिंगसाठी चांगले ठिकाण
मोदी म्हणाले की, "भारतात लग्नावर आधारित अर्थवस्था खूप मोठी आहे. त्यामुळे मी देशातच लग्न करण्याचे आवाहन देशवासीयांना केलं आहे. आता प्री वेडिंगसाठी नागरिक उत्तराखंडमध्ये येऊ शकतात. चित्रपटांच्या शूटिंगसाठीही उत्तराखंड चांगले ठिकाण आहे. चांगल्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. फिल्म फ्रेंडली पुरस्कार उत्तराखंडला मिळाला आहे", असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री धामी यांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत
पंतप्रधान मोदी यांचं राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वागत केलं. उत्तराखंडच्या चौफेर विकासाबरोबरच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. जी-२० परिषद, जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन, समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी असो वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धचे आयोजन, मोदीजी कायम राज्याला मार्गदर्शन करतात, असे मुख्यमंत्री धामी म्हणाले.
गौरीकुंड ते केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड याठिकाणी रोपवे उभारण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.