नवी दिल्ली - केंद्रातली मोदी सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला सर्वाधिक हायटेक एक्स्प्रेस वेचं गिफ्ट दिलं आहे. देशातील पहिल्या स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस वेच्या निर्माणासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च आला. ईस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेस-वे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज त्याचा शुभारंभ केला. कुंडली ते पलवलपर्यंत 135 किमी लांब असा हा एक्स्प्रेस वे आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे चे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील बागपत येथे जनतेला संबोधित केले.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सर्जिकल स्ट्राईक्स करणाऱ्या देशाच्या सेनेने दाखवलेल्या साहसाला हे लोक नाकारतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय एजन्सीज भारताचे कौतुक करतात तेव्हा हे लोक त्यांच्याही मागे दांडके घेऊन मागे लागतात. त्यामुळे एका कुटुंबाची पूजा करणारे, कधी लोकशाहीची पूजा करू शकत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.
शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष विकास कामांबाबत नेहमीच काहीही बोलत असतात आणि नेहमीच मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या विकासात अडथळे येतील असे वागत असतात. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधातील खटले चालवण्यासाठी विशेष कोर्टांची स्थापना केल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.