गंगटोक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं आहे. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी मोदी कालच गंगटोकमध्ये दाखल झाले होते. त्याआधी त्यांनी झारखंडमधील रांची येथे आयुष्यमान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. आज पंतप्रधान मोदी सिक्कीम दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळीच राज्यातील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं. या विमानतळाचं काम 2009 मध्ये सुरू झालं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.