लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठकीत आढावा घेतला. विविध राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला प्रत्यक्ष वा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करा असा आदेश पंतप्रधानांनी दिल्याचे कळते.
संसर्ग रोखण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असा निर्णय इतर राज्यांतही घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नव्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळेल तिथे कडक निर्बंध लागू करा अशा सूचना केंद्र सरकारने याआधीच राज्यांना दिलेल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य खातेही कोरोना स्थितीचा वारंवार आढावा घेत आहे.