नवी दिल्ली : समाजसेवी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. कृषी, शिक्षण आणि आरोग्य या तीन क्षेत्रांत तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आपण सर्वाधिक उत्सुक आहोत, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी या क्षेत्रातील सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
तंत्रज्ञान, विविध क्षेत्रांत त्याचा वापर आणि हवामान बदल यासह अनेक मुद्यांवर गेट्स यांच्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आपण जगात डिजिटल विभाजनाबद्दल ऐकले होते आणि तेव्हाच भारतात हे होऊ देणार नाही, असे ठरविले होते. गर्भाशय कर्करोगावर कमीत कमी खर्चात लस विकसित करण्यासाठी स्थानिक संशोधकांना मदत म्हणून निधी देण्याची आपली इच्छा आहे.
आपले नवीन सरकार या गंभीर आजाराविरुद्ध लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी काम करेल. त्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांची गरज आहे. गेट्स यांनी भारताच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे कौतुक करत भारत या मार्गावर अग्रेसर असल्याचे सांगितले. गेट्सच्या एका प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, मला तंत्रज्ञानाची आवड आहे पण त्याचा गुलाम नाही. मी तज्ज्ञ नाही पण तंत्रज्ञानाबद्दल मुलांसारखी उत्सुकता आहे.
‘एआय’चा गैरवापर होण्याचा धोकाकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सारखे शक्तिशाली तंत्रज्ञान अकुशल हातात गेल्यास त्याचा गैरवापर होण्याचा मोठा धोका आहे. चुकीची माहिती टाळण्यासाठी एआय निर्मित सामग्रीमध्ये स्पष्ट वॉटरमार्क असणे आवश्यक आहे. एआय निर्मिती करताना काय करावे आणि करू नये हे निश्चित करणे आवश्यक आहे, अशी सूचना मोदींनी केली.
आणखी काय काय बोलले मोदी?नागरिकांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर विश्वास.खर्च कमी करण्यासाठी सर्व विद्यापीठ प्रमाणपत्रे क्लाउड स्टोअरेजमध्ये साठवण्यास सुरुवात.डेटा सुरक्षा सर्वांत महत्त्वाची चिंता.भारत अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती आणि हरित हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. खेड्यापाड्यात तंत्रज्ञान घेऊन जात आहोत. दोन लाखांहून अधिक आरोग्य केंद्रांना तंत्रज्ञानाने सर्वोत्तम रुग्णालयांशी जोडले.