PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. दुपारी 3 वाजता पंतप्रधानांचे संबोधन सुरू होणार आहे. दरम्यान, पीएम मोदी संसदेत निळ्या रंगाचे एक खास जॅकेट घालून आले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे हे जॅकेट कपड्याने नाही, तर फक्त प्लास्टिक बाटल्यांचे रिसायकल करुन तयार करण्यात आले आहे.
कोणी भेट केले जॅकेट?पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे खास जॅकेट सोमवारी बंगळुरुमध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीकदरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने भेट म्हणून दिले आहे. हे जॅकेट पीईटी (PET) बाटल्यांचे रिसायकल करुन बनवण्यात आले आहे. इंडिया एनर्जी वीकचे उद्दिष्ट ऊर्जा परिवर्तनामध्ये भारताला महाशक्ती बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
पीएम मोदींचे जॅकेट कसे तयार झाले?तमिळनाडूच्या करुरमधील कंपनी श्री रेंगा पॉलीमर्सने पीएम मोदींचे हे जॅकेट तयार केले आहे. कंपनीने इंडियन ऑईलला PET बॉटलद्वारे तयार करण्यात आलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे पाठवले होते. यातील एक कपडा पीएम मोदींसाठी निवडण्यात आला. नंतर हा कपडा गुजरातमध्ये मोदींच्या नेहमीच्या टेलरकडे पाठवला आणि त्याने हे जॅकेट शिवले.
एका जॅकेटसाठी किती बाटल्यांचा वापर?अशाप्रकारचे एक जॅकेट तयार करण्यासाठी 15 बाटल्यांची गरज असते. तसेच, एक फूल ड्रेस तयार करण्यासाठी 28 बाटल्यांची गरज पडते. याला रंगवण्यासाठी पाण्याचा वापर होत नाही. विशेष म्हणजे, अशाप्रकारे प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेल्या जॅकेटची किंमत फक्त 2000 रुपयांच्या आसपास आहे.