नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत परिधान केलेलं जॅकेट चर्चेचा विषय ठरलं. कारण त्यांनी परिधान केलेलं जॅकेट प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेलं होतं. याची माहिती समोर येताच मोदींच्या या खास जॅकेटची जोरदार चर्चा सुरू झाली. आता हे जॅकेट पुढील तीन महिन्यांत देशातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिडेटचे अध्यक्ष एसएम वैद्य यांनी दिली. ते बंगळुरूमध्ये इंडिया एनर्झी वीक-२०२३ मध्ये बोलत होते.
इंडियन ऑइलच्या 'अनबॉटल' उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरूमध्ये पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या गणवेशाचं लॉन्चिंग केलं होतं. इंडियन ऑईल कंपनीनं यावेळी पंतप्रधान मोदींना निळ्या रंगाचं जॅकेट भेट दिलं होतं. तेच जॅकेट मोदींनी काल सभागृहात परिधान केलं होतं. त्याबाबत मोदींचं कौतुकही सुरू आहे.
"तीन महिन्यांच्या आत प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले जॅकेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. लोक IOCL, BPCL आणि HPCL सारख्या तेल विपणन कंपन्यांच्या रिटेल आऊटलेटवर हे जॅकेट खरेदी करू शकणार आहेत", असं एसएम वैद्य म्हणाले. याशिवाय मोदींनी हे जॅकेट परिधान करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला असल्याचंही ते पुढे म्हणाले.