नवी दिल्ली: नीरव मोदी भारतीय बँकांचे तब्बल 30 हजार कोटी रूपये घेऊन फरार झाला. दुसरीकडे सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्यांना अनेक दिवस रांगेत उभे राहायला लावले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दल तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत. त्यांनी भारतीय बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं आहे, असा घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या राज्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या लोकांना 'अच्छे दिन' आले तर जनता, शेतकरी व मजुरांसाठी 'बुरे दिन' आले आहेत. एरवी नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात भाषणं देत फिरतात. मात्र, पीएनबी घोटाळा व राफेलसारख्या मुद्दयांवर त्यांना विरोधी पक्षांसमोर धड 15 मिनिटंही उभं राहता येत नाही, असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला.
मोदींनी बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं; राहुल गांधींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 1:42 PM