PM Modi Speech: येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपचे दक्षिण भारतावर विशेष लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, बुधवारी (3 डिसेंबर) केरळमधून पीएम मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
केरळच्या त्रिशूरमध्ये पीएम मोदी म्हणाले की, 'काँग्रेस आणि डाव्यांनी केरळची लूट केली. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस दीर्घकाळापासून सत्ताधारी आणि विरोधक असल्याचे भासवता. हे नावाचे दोन पक्ष आहेत. भ्रष्टाचार असो, गुन्हेगारी असो किंवा घराणेशाही असो, हे दोघे मिळून सर्वकाही करतात. आता इंडी अलायन्स स्थापन करुन त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या विचारधारा आणि धोरणांमध्ये कोणताही फरक नाही.'
मोदी पुढे म्हणतात, 'देशभरात नवीन रस्ते बांधले जाताहेत, आधुनिक रेल्वे स्थानके आणि आधुनिक विमानतळ बांधले जाताहेत. पण, राज्यातील इंडी आघाडीचे सरकार मोदींच्या विरोधामुळे ही काम होऊ देत नाहीय. इंडिया आघाडीला राज्याला लुटण्याचे स्वातंत्र्य हवेय. राज्यात सोन्याच्या तस्करीचा खेळ सुरू आहे. हा कोणाच्या कार्यालयातून होतो, हे सर्वांनाच माहितेय. केंद्र सरकारने दिलेल्या निधीची चौकशी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे,' अशी टीका मोदींनी केली.
'इंडिया आघाडी आमच्या विश्वासाला धक्का पोहचवते. त्यांनी मंदिरे आणि आमच्या सणांनाही लुटीचे माध्यम बनवलंय. सबरीमालामध्ये घडलेल्या गोंधळामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. हा राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. देशात डावे आणि काँग्रेसचे युतीचे सरकार होते, तेव्हा मुस्लिम भगिनी तिहेरी तलाकमुळे त्रस्त होत्या. आम्ही मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकपासून मुक्ततेची हमी दिली होती आणि ती प्रामाणिकपणे पूर्णही केली, असंही पीएम मोदी यावेळी म्हणाले.