“सरकार बनविण्यासाठी नाही, देश घडवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागतात”; PM मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:04 AM2022-08-20T06:04:09+5:302022-08-20T06:05:31+5:30

देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

pm modi lashed out at the opposition it does not take much effort to make a govt | “सरकार बनविण्यासाठी नाही, देश घडवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागतात”; PM मोदींचा विरोधकांना टोला

“सरकार बनविण्यासाठी नाही, देश घडवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागतात”; PM मोदींचा विरोधकांना टोला

Next

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशाच्या वर्तमान व भविष्याबद्दल चिंता नसलेले लोक जलसंधारणाविषयी फक्त भाषणे देण्याचे काम करतात. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या लोकांनी काहीही प्रयत्न केले नाहीत़. सरकार बनविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. मात्र देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. 

गेल्या तीन वर्षांत देशाच्या ग्रामीण भागातील सात कोटी कुटुंबांना ‘हर घर जल’ योजनेद्वारे नळजोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे आता देशाने ग्रामीण भागातील घरांना १० कोटी नळजोडण्या देण्याचा टप्पा पार केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

जलसुरक्षा हा जगाला भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. विकसित भारत या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना जलसुरक्षा नसेल तर मोठी समस्या उद्भवू शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सात दशकांत ग्रामीण भागांतील फक्त तीन कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र तीन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन जाहीर केल्यानंतर सात कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारांवर केली. या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित होते.

२०२४च्या लाेकसभा निवडणुकीत होणार फायदा?

हर घर जल ही योजना ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाली. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांत २०२४च्या आधी ‘हर घर जल’ योजना राबवू इच्छिते. २००९ साली मनरेगा योजनेमुळे यूपीएचे केंद्रामध्ये पुन्हा सरकार स्थापन झाले. तर हर घर शौचालय, गरिबांना मोफत घर या योजनांमुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला लाभ झाला होता. गेल्या या तीन वर्षांत या कामासाठी ५१२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ‘हर घर जल’ योजनेमुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल अशी शक्यता त्या पक्षाला वाटत आहे. 

हर घर जल योजनेकडे बारीक लक्ष

- ग्रामीण भागांतील प्रत्येक घराला नळजोडण्या देतानाच त्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यावरदेखील केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हर घर जल योजनेच्या अंमलबजावणीवर वेबसाइट व ॲपच्या माध्यमातून केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवते. या योजनेबाबत तक्रारींचा लगेचच निपटारा केला जातो.

- दादरा-नगरहवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण भागातल्या सर्व घरांनाही नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.

Web Title: pm modi lashed out at the opposition it does not take much effort to make a govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.