नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G टेस्टबेड ( 5G Testbed) लॉन्च केले. यावेळी स्वनिर्मित 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रिटिकल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या प्रोजेक्ट संबंधित सर्व सहकाऱ्यांचे आमच्या आयआयटीचे (IITs) अभिनंदन करतो. 5Gi च्या रूपात, जे देशाचे आपले 5G standard बनवले आहे, ते देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे देशातील खेड्यापाड्यात 5G तंत्रज्ञान पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याचबरोबर, 21 व्या शतकातील कनेक्टिव्हिटी भारताच्या प्रगतीचा वेग निर्धारित करेल. त्यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीला आधुनिक बनवायला हवे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5G तंत्रज्ञान देशाच्या कारभारातही सकारात्मक बदल घडवून आणणार आहे, राहणीमानात सुलभता, व्यवसायात सुलभता आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. तसेच, यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.
येत्या 15 वर्षांत 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 450 मिलियन डॉलर्सचा फायदा होईल, असा अंदाज असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 2G युग निराशा, पॉलिसी पॅरालिसिस आणि भ्रष्टाचाराचे होते. तिथून आम्ही 3G, 4G, 5G आणि 6G वर गेलो आहोत आणि हे पूर्ण गतीने आणि पारदर्शकतेने होत आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींना मागील सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, टास्क फोर्स या दशकाच्या अखेरीस 6G प्रणाली सुरू करण्यासाठी काम करत आहे.