Ayushman Bharat Digital Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच केलं. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच केलं. या मोहिमेसाठी सरकारनं ऐतिहासिक करार केला आहे आणि याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असे आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर एक आधार प्रमाणेच नंबरही असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल."गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज तो एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मोहिमेची सुरूवात करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल आणण्याची ताकद आहे," असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. "डिजिटल इंडिया या मोहिमेनं सामान्यांची ताकद अधिक वाढवली आहे. आज आपल्या देशातत १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वारकर्ते आमि ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. असं जगात अन्य ठिकाणी कुठेही नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय आहे फायदा?युनिक हेल्थ आयडीमुळे रुग्णांना डॉक्टरांकडे जाताना फाईल्स सातत्यानं नेण्यापासून सुटका मिळेल. तसंच डॉक्टरांनाही नंबरच्या सहाय्यानं रुग्णांचा डेटा पाहण्यास आणि त्यांची माहिती घेण्यास माहिती मिळेल. याच आधारावर रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहे. तसंच संबंधित व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो हेदेखील त्यावरून समजणार आहे.
या हेल्थ कार्डसाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक घेतला जाईल. याच्या सहाय्यानं मोबाईल हेल्थ कार्ड तयार केलं जाणार आहे. यासाठी सरकार एक हेल्थ अथॉरिटी बनवेल जे व्यक्तीचा डेटा गोळा करणार आहे. ज्या व्यक्तीला हेल्थ आयडी तयार करायचं आहे त्याच्या रेकॉर्ड जमा करण्याची हेल्थ अथॉरिटीकडून परवानगी देण्यात येईल.