नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. मेच्या मध्यापासून देशात आढळून येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं बऱ्याच राज्यांनी लॉकडाऊन रद्द केला आहे. निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडू लागले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला आणखी तयारी करावी लागेल, असं मोदी शुभारंभानंतरच्या भाषणात म्हणाले. देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून १ लाख कोरोना फ्रंट लाईन वॉरियर्स तयार केले जातील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकार विविध आघाड्यांवर तयारी करत असल्याचं मोदींनी सांगितलं.आता नदीलाही कोरोनाचा विळखा, साबरमती नदीतील सर्व नमुने सापडले बाधित
कोरोनाचा विषाणू आपलं स्वरुप वारंवार बदलत असल्याचं आपण दुसऱ्या लाटेदरम्यान पाहिलं. हा विषाणू अद्यापही जिवंत आहे आणि तो म्युटेट होण्याचा धोका कायम आहे. सरकार, समाज, संस्था आणि व्यक्ती म्हणून आपल्या क्षमता वाढवायल्या हव्यात, त्यांचा विस्तार व्हायला हवा, या दृष्टीनं कोरोना महामारीनं आपल्याला सतर्क केलं आहे. सध्या देशभरात लाखो कोरोना वॉरियर्स नेटानं संकटाचा मुकाबला करत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी देशातील १ लाख तरुणांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या महाअभियानाचे दोन फायदे होतील. आपल्या आरोग्य क्षेत्रातील फ्रंट लाईन वर्कर्सना नवी ऊर्जा मिळेल आणि आपल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. गेल्या ७ वर्षांत देशभरात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची, नर्सिंग महाविद्यालयांची, एम्सची उभारणी करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आलं. यातील अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे, असं मोदींनी सांगितलं.