लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदीजम्मू-काश्मीरमधील लेह दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा येथील पहिलाच दौरा आहे. लेहमधील नवीन विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी लोकांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'टर्मिनल बिल्डिंगचे भूमीपूजन केले आहे, तुमचा आशीर्वाद मिळाला तर टर्मिनल बिल्डिंगचे लोकार्पण सुद्धा करायला येईन'.
"गेल्या तीन दशकापूर्वी या विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग बनविण्यात आली होती. त्यावेळी या टर्मिनल बिल्डिंगच्या अत्याधुनिकतेकडे लक्ष देण्यात आले नाही. मात्र, आज नवीन टर्मिनल बिल्डिंगचे भूमीपूजन झाले आहे. ते अत्याधुनिक असेल. जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर लोकार्पण सुद्धा करायला येईल", असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
याचबरोबर, नरेंद्र मोदी काश्मीरमधील विजयपूर आणि अवंतीपूरा येथील नवीन एम्स रुग्णालयांची पायाभरणी करणार आहेत. याशिवाय विविध विकास योजनांचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याच दरम्यान, ते प्रसिद्ध दललेक परिसरालाही भेट देणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या जम्मू-काश्मीरमधील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावादी नेत्यांनी बंदचे आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यामुळे हुरियत कान्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक उमर याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. तर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार उफाळून येऊ नये म्हणून पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.