वाराणसी : उत्तर प्रदेशातीलवाराणसीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लक्षणीय ठरली. हे स्टेडियम केवळ वाराणसीसाठीच नाही तर पूर्वांचलच्या तरुणांसाठीही वरदान ठरेल. जेव्हा हे स्टेडियम तयार होईल, तेव्हा तीस हजारहून अधिक लोक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील, असे यावेळी मोदींनी सांगितले. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांसह बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा हे देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, याप्रसंगी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, रवी शास्त्री, बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाचं एवढं मोठं मैदान तयार झाल्यावर केवळ क्रीडा क्षेत्रातीलच नव्हे तर स्थानिक लोकांनाही फायदा होईल. मोठा सामना पार पडला की हॉटेल चालकांना फायदा होईल, बोट मालकांना फायदा होईल. वाराणसीमध्ये अनेक मोठे क्रीडा उद्योगही येतील. काशीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी झाली असून हे पूर्वांचलसाठी वरदान ठरणार आहे. यामध्ये ३० हजार लोक एकत्र बसून क्रिकेटचा सामना पाहू शकतात. यामध्ये आजूबाजूच्या भागातील युवा खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी मिळणार असून माझ्या काशी क्षेत्रातील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढणार असून स्टेडियमची संख्याही वाढवली जाईल. उत्तर प्रदेशातील हे पहिले स्टेडियम असेल ज्यामध्ये बीसीसीआयचे सहकार्यही असेल.