मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता आजही कायम आहे. फेसबुकनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीय. फेसबुक पेजवरील लोकप्रियतेचा विचार केल्यास लोकसभेतील सर्व खासदारांना मोदींनी मागे टाकलंय. मोदींच्या पाठोपाठ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा क्रमांक लागतो. तर आम आदमी पार्टीचे पंजाबमधील खासदार भगवंत मान तिसऱ्या स्थानावर आहेत. हैदराबादचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांना फेसबुकनं एक पत्र पाठवलंय. त्यामध्ये त्यांनी सर्वेक्षणाचा उल्लेख करत ओवेसी यांचं अभिनंदन केलंय. 'सरकारी विभाग, मंत्री आणि राजकीय पक्षांच्या फेसबुकवरील पेजचं आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचं आम्ही सर्वेक्षण केलं. यासाठी फेसबुक पेजवरील 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील पोस्ट, त्यावरील रिअॅक्शन, कमेंट्स, शेअर्स यांचा विचार करण्यात आला. तुम्हाला (असदुद्दीन ओवेसींना) हे समजल्यावर आनंद होईल की फेसबुक पेजवरील लोकप्रियतेच्या बाबतीत लोकसभेतील सर्व खासदारांमध्ये तुम्ही दुसऱ्या स्थानावर आहात,' असं फेसबुकनं ओवेसींनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. एप्रिल महिन्यात फेसबुकनं देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर होते. या यादीत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दुसऱ्या, तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तिसऱ्या स्थानावर होते. विशेष म्हणजे हे तिघेही भाजपाचे नेते आहेत.
'या' यादीत पंतप्रधान मोदी पहिले, तर ओवेसी दुसरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 12:38 PM