"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 19:40 IST2024-07-02T19:39:39+5:302024-07-02T19:40:42+5:30
जवळपास अर्ध्यातासांच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले.

"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण सुरू केल्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. मात्र, विरोधकांच्या गदारोळातही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी नेत्यांनी त्यांचे ऐकले नाही. जवळपास अर्ध्यातासाच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले.
ही आता परजीवी काँग्रेस... -
काँग्रेसला साथ देणाऱ्या पक्षांसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी लोकसभा निवडणूक निकालांचे व्यवस्थित विश्लेषण केले नाही, असे वाटते. 2024 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस परजीवी झाली आहे. ही आता परजीवी काँग्रेस आहे. परजीवीसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, परजीवी ज्याच्यासोबत असते, त्यालाच खाऊन टाकते.
काँग्रेसचे नेते शीर्षासन करतायत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजकाल काँग्रेसचे नेते शिरशासनात व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्यांना पराभव दिसत नाही. काँग्रेस लहान मुलांप्रमाणे वागत आहे. ज्या राज्यात त्यांनी एकट्याने निवडणूक लढवली, तेथे त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली आहे, हे काँग्रेसने समजून घ्यायला हवे. काँग्रेसची अवस्था सध्या अशी झाली आहे, जसे एखाद्या मुलाचे मनोरंजन केले जात आहे.
नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा -
राहुल गांधी यांच्या सोमवारच्या भाषणाचा समाचार घेत, नाव न घेता मोदी म्हणाले, "सहानुभूती मिळवण्याचे काम सुरू आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकं सुरू आहेत. हजारो कोटी रुपयांच्या गुन्ह्यात ते जामिनावर आहेत. यांच्याविरोधात सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. यांच्यावर संस्थांसंदर्भात खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. राहुल यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, हे डोळे मारतात. तुमच्याकडून होणार नाही, असे आता खुद्द काँग्रेसच त्यांना सांगत आहे.