PM Narendra Modi on Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान बोलताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर घराणेशाही आणि इतर विकासच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. तसेच, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोपही केला.
पंतप्रधान मोदींचे दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे भाषण असल्यामुळे, या भाषणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अनेकजण मोदींचे खूप कौतुक करत आहेत. अशातच प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनीही ट्विटरवरुन पंतप्रधानांची स्तुती करताना लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आजचे संसदेतील भाषण एका यशस्वी राजकारण्याने राजकीय विचार व्यक्त करण्याचे अप्रतिम उदाहरण होते. गुजराती भाषक असूनही त्यांनी हिंदीतून ज्या पद्धतीने त्यांच्या विचारसरणीची स्पष्ट रेषा रेखाटली, ते राजकारणात काम करणाऱ्या सर्वांसाठी शिकण्यासारखे आहे."
आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही केले कौतुकदुसरीकडे सातत्याने भाजपची स्तुती करणारे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही या भाषणाचे कौतुक केले आहे. कुमार विश्वास यांनी पीएम मोदींच्या स्तुतीसाठी लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी लिहिले, "उत्कृष्ट कार्य - महान व्यक्तिमत्व." या कौतुकाने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधिकच रंगली आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांनी पीएम मोदी आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
कुमार विश्वास यांना भाजपाकडून उमेदवारी?लवकरच राज्यसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश भाजपाने राज्यसभेच्या 7 जागांसाठी 35 नावांची यादी तयार केली आहे. नेते सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावासोबतच या यादीमध्ये कवी कुमार विश्वास यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कुमार विश्वास राजकीय वर्तुळात दिसण्याची शक्यता आहे. तसेच, सतत आपल्याच पक्षावर टीका करणारे आचार्य प्रमोद यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.