PM Modi Diwali in Kargil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कारगिलमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. या दरम्यान एका तरुण लष्करी अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींना खास भेट दिली. ती भेट पाहून पंतप्रधान मोदीही भावूक झाल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये मेजर अमित यांची भेट घेतली. यावेळी मेजर अमित यांनी मोदींना अतिशय खास असा फोटो भेट दिला आणि साऱ्यांचेच मन जिंकले.
२००१ मध्ये टिपण्यात आला होता फोटो
मेजर अमित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलेला फोटो हा २००१ मधील होता. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा हा फोटो होता. मोदी गुजरातच्या बालाचडी येथील सैनिक शाळेत गेले होते आणि अमितने तिथे सैनिकी शिक्षण घेतले होते, तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. फोटोत अमित आणि दुसरा विद्यार्थी नरेंद्र मोदींकडून ढाल घेताना दिसत आहेत. तो फोटो आज मेजर अमित यांनी मोदींना भेट दिला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मोदींची पुन्हा भेट घडणं खूपच भावनिक क्षण!
मेजर अमित यांनी सांगितले की त्यांनी गुजरातच्या बालाचडी येथील सैनिक शाळेत मोदींची भेट घेतली होती. तेव्हा मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये त्या शाळेला भेट दिली होती. त्यापुढे बोलताना मेजर अमित म्हणाले, "आज कारगिलमध्ये जेव्हा आम्ही पुन्हा एकमेकांना भेटलो, तेव्हा ती भेट भावनिक पद्धतीची झाली."
दरवर्षी पंतप्रधान मोदी सीमेवरील जवानांसमवेत करतात दिवाळी साजरी
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यावेळी सलग नवव्यांदा ते जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले. या आधी पंतप्रधान मोदींनी २३ ऑक्टोबर २०१४ रोजी सियाचीन, ११ नोव्हेंबर २०१५ रोजी पंजाब, २० ऑक्टोबर २०१६ रोजी हिमाचलमधील किन्नौर, १८ ऑक्टोबर २०१७ रोजी जम्मू-काश्मीरमधील गुरेझ, ७ नोव्हेंबर २०१८ रोजी उत्तराखंडमधील हर्षिल, २७ ऑक्टोबर २०१९ रोजी राजौरीतील नियंत्रण रेषेवर, १४ नोव्हेंबर २०२० रोजी जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्टवर आणि ४ नोव्हेंबर २०२१ रोजी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.