लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक तज्ज्ञ भाजप+ विरुद्ध काँग्रेस+ यांचे मूल्यांकन करताना दिसत आहेत. भाजपचा सामना करताना विरोधक नेमके कुठे उभे आहेत, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. हाच प्रश्न निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारला असता, त्यांनी विरोधकांना काही बारीकसारीक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशांत किशोर म्हणाले, आपण ऐकता की, मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही.
मोदीजींनी अयोध्येसंदर्भात 4 वर्षांपूर्वीच विचार केला असेल...- बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीके म्हणाले, इतर पक्षांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये व्हावा, यासाठी किमान 3 ते 4 वर्षांपूर्वीच कुणी विचार केला असेल आणि त्यनुसारच मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सर्व गोष्टींचा विचार त्यांनी चार वर्षांपूर्वीच केला असेल. कारण एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे.
तीन वर्षांपूर्वीच करायला हवी होती आघाडी - किशोर म्हणाले, जर ही गोष्ट मोदींना माहीत आहे, ते त्या दिशेने काम करत आहेत, पत्रकारांनाही माहीत आहे, तर मग हे विरोधकांना का माहीत नव्हतं, की मंदिर निवडणुकीपूर्वीच उभे राहील, प्राणप्रतिष्ठा होईल, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. कसल्याही प्रकारची तयारी नाही. तो विचार कधी नव्हताच. जागा वाटप आज होवो अथवा 6 महिन्यांपूर्वी होवो, निवडणुकीची वेळ तर सर्वांनाच माहीत होती. जे लोक आज I.N.D.I.A.मध्ये आहेत. त्यांना ही आघाडी तयार करण्यापासून कुणी रोखले होते का? तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला असता, तीन वर्षांपूर्वीच जागावाटप केले असते. त्यांच वेळी त्यांनी आपल्या आघाडीचे नाव 'I.N.D.I.A.' ठेवले असते.
किशोर पुढे म्हणाले, विरोधकांची ही आघाडी तीन वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली असती, तर अधिकांश लोकांना ती समजली असती. त्याच वेळी जागावाटप झाले असते, तर आपल्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार हेही लोकांना अधिक कळले असते. त्यांना कुणी रोखले होते? गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची आप आणि सपासोबतची युती निश्चित झाली होती. पीके यांनी याला फार उशीर झाल्याचे म्हटले आहे.
400+ एक प्रेशर...- किशोर म्हणाले, आम्ही 400 जागांवर जिंकत आहोत, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी संसदेत उभे राहून म्हणत आहेत. ते एक सायकलॉजिकल प्रेशर तयार करत आहेत. अर्थात जय-पराजयावर चर्चाच होत नाहीय. आता लोक विचारत आहेत, की 400 येणार की नाही.